जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कुसुंबा गावात दारूच्या नशेत पूर्णपणे धुंद झालेल्या खंडेराव पाटील नामक व्यक्तीने क्षुल्लक वादातून पत्नी सोनीबाई हिच्या हाताच्या बोटाला इतक्या क्रूरपणे चावा घेतला की तिच्या बोटाचा तुकडा पडला. इतकेच नव्हे, तर पत्नीचा भावाला देखील खंडेरावने मारहाण केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुसुंबा येथील श्रीकृष्ण नगरमध्ये राहणारे खंडेराव पाटील हे नेहमीच दारूच्या आहारी गेलेले असतात. काल रात्री देखील ते दारू पिऊन घरी आले आणि पत्नी सोनीबाईसोबत त्यांचा वाद सुरू झाला. वाद इतका विकोपाला गेला की खंडेराव याने दारूच्या नशेत पत्नीवर हल्ला केला. त्यांनी सोनीबाईच्या उजव्या हाताच्या करंगळीजवळच्या बोटाला जोरदार चावा घेतला. हा चावा इतका गंभीर होता की सोनीबाईच्या बोटाचा तुकडा तुटून खाली पडला.
सोनीबाई यांचा भाऊ ईश्वर याच्यासोबत सुरू असलेल्या हाणामारीत त्याला वाचवण्यासाठी त्या मध्ये पडल्या असता खंडेराव यांनी त्यांच्यावर हा अमानुष हल्ला केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खंडेराव पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे. घडलेल्या या अमानुष घटनेनंतर सोनीबाई आणि ईश्वर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनीबाईच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, तिच्या तुटलेल्या बोटावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि खंडेराव पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.