जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहर महानगर पालिकेने बुधवारी २३ सप्टेंबर रोजी भंगार बाजाराचा तत्कालीन नगरपालिकेने ९९ वर्षाचा केलेला करार रद्द करण्याचा ठराव पारित केला. तो ठराव मनपा प्रशासनाने त्वरित विखंडित करावा अशी आशयाची मागणी जळगाव मुस्लिम मंच मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकारी जळगाव यांच्यामार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर निवेदन मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष मझर खान, शिवसेनेचे महानगर उपाध्यक्ष रईस शेख,एमआयएमचे जिल्हा सहसचिव खालिद खाटीक यांच्या हस्ते निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना सुपूर्द करण्यात आले. निवेदनात म्हंटले आहे की, तत्कालीन नगरपालिकेचा १९९९ सालाचा पारित झालेला ९९ वर्षाचा भंगार बाजाराचा ठराव हा २०१९ साली महासभे समोर आला असता चार सदस्यीय समिती गठीत करून ती समिती यावर अभ्यास करेल व त्या अहवालावर पुढील कारवाई करण्यात येईल असे ठरले.चार सदस्यीय समिती गठित करण्यात आली. चार पैकी एक नगरसेवक सतत गैरहजर राहिला, एका सदस्याने राजीनामा दिला आशा प्रकारे फक्त दोन नगरसेवकाच्या समितीने अहवाल दिल्याने ही समिती कायदेशीर आहे का असा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला होता.
भंगार बाजारात ११२ दुकानदार आहेत त्यांनी जर मिळकत भाडे व मालमत्ता कर भरले नसेल तर त्यांना संधी देऊन ते भरून घ्यावे व तत्कालीन नगरपालिकेने शासनाची मान्यता घेतली नसेल तर मनपाने ही मान्यता घ्यावी अशी सुचना सुद्धा या निवेदनात केलेली आहे.११२ दुकानदारावर सुमारे तीनशे ते चारशे कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. अशा या ११२ दुकानदार जे पूर्वीचे पुनर्वसित झालेले होते. त्यांना आपल्या हक्काच्या जागेवरून काढून लावणे हे उचित नाही असे मुस्लिम मंचचे म्हणणे आहे.
महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष हा संख्याबळावर जास्त असल्याने सदरचा ठराव पारित केला गेला असला तरी त्यास पंधरा शिवसेनेचे १५ व एमआयएमचे ३ नगर सेवकांनी ठरावाला विरोध दर्शविला असल्याने सदरचा ठराव विखंडित करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे.