चाळीसगाव (प्रतिनिधी)- चाळीसगाव शहरातील क्रिश वाईन्सचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश आज जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी जारी केले आहेत. जिल्हाभरात गाजलेल्या लॉकडाऊन काळातील मद्यतस्करीच्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिस ठाण्याचे तत्कालिन पोलिस निरीक्षक रणजीत शिरसाठ व शहरातील काही पोलिस कर्मचारी बडतर्फ झाल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात व्यापक तपासणी मोहीम राबवून संशयित दारू दुकानांवर धाडीही टाकलेल्या होत्या . त्यानंतर शहरातील एका मोठ्या राजकीय नेत्याच्या पत्नीच्या नावे परवाना असलेल्या दारूच्या दुकानाचाही परवाना रद्द करण्यात आला होता. आता त्यानंतरची ही तिसरी मोठी कारवाई आहे.
चाळीसगावच्या राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या निरीक्षकांनी राज्य उत्पादन शुल्क जिल्हा अधीक्षकांच्या आदेशानुसार चाळीसगाव शहरातील क्रिश वाईन्सच्या परवान्याचे व साठ्याचे आणि नोंदींचे निरीक्षण करून 27 एप्रिलरोजी आपला अहवाल वरिष्ठांना सादर केला होता.मे. क्रिश वाईन्सचे मालक दिनेश नोतवाणी व विकी नोतवाणी यांनी लॉकडाऊनच्या काळात कायद्याचे उल्लंघन केलेले आहे. त्यासाठी विविध मुद्द्यांवर 9 प्रकारचे आक्षेप या तपासणी अहवालात नोंदविण्यात आले होते. शेरेपुस्तिका नाही, नोकरनामे नाही, देशी-विदेशी मद्य व बिअरच्या साठ्यात तफावत, नोदवही अद्ययावत नाही, देशी मद्य परवाना परिवहन पास नाही, देशी मद्याचा बेहिशेबी साठा अशा स्वरुपाचे हे आक्षेप होते.
जळगावातील मद्यतस्करीच्या आर.के. वाईन्स शॉपच्या गुन्ह्यातही दिनेश मोतवाणी आरोपी आहेत. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार मे. क्रिश वाईन्सचे मालक दिनेश नोतवाणी व विकी नोतवाणी यांच्याविरुध्द साथरोग नियंत्रण कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा , भा.दं. वि. कलम 188, राज्याचा दारूबंदी कायदा, देशी व विदेशी मद्य परवाना अधिनियमानुसार कारवाई करून हा परवाना रद्द करण्यात आला आहे.







