नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – बीजिंग,भारत-चीन सीमेवर सध्या लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल अर्थात एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी शांततापूर्वक तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र दुसरीकडे चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने भारतात सुरु असलेल्या ‘बॉयकॉट चायना प्रॉडक्ट्स’ मोहीमेवरुन निशाणा साधला आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणे एवढे सोपे नाही. आमच्या वस्तू भारतीयांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनल्या असून त्या हटवणे कठीण आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहीम पूर्णपणे अपयशी ठरेल, असे ग्लोबल टाईम्सने आपल्या लेखात म्हटले आहे.
ग्लोबल टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या या वृत्तानुसार चीनने भारताच्या मोहिमेविषयी लेख प्रकाशित केला आहे. भारतातील काही अतिराष्ट्रवादी पक्ष सातत्याने चीनला बदनाम करण्याचा कट आखत असतात. चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहीम पहिल्यांदाच घडलेली नाही. पण आम्ही भारताला समजावू इच्छितो की याचा काहीच उपयोग होणार नाही आणि हे शक्य देखील नसल्याचे चीनकडून म्हटले गेले आहे.
या लेखात सोनम वांगचूक यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. व्हिडीओद्वारे सोमन वांगचूक यांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करत ‘बॉयकॉट चायना प्रॉडक्ट्स’ ही मोहीम सुरु केली आहे. त्यांच्या या व्हिडीओवर तसेच रिमूव्ह चायनीज अॅप या अॅपवरही चीनने आक्षेप नोंदवला आहे. चीनच्या तक्रारीनंतर गुगल प्ले स्टोअरवरुन हे अॅप हटवण्यात आले. अँड्रॉईड फोनमधून चिनी अॅप शोधण्याचे काम हे अॅप करत होते. भारत आणि चीन सीमा वाद ही नवी गोष्ट नाही. तसंच हा एवढाही तणाव गंभीर नाही जेवढी भारतात यावर काही विचारधारेचे लोक चर्चा करत आहेत. दोन्ही देश सातत्याने यावर चर्चा करत असून भारत सरकारची भूमिका सकारात्मक आहे. परंतु काही भारतीय माध्यमं आणि काही भारतीय चुकीची माहिती आणि अफवा पसरवून चीनला कलंकित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे शांघाय इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल स्टडीजचे झाओ जेनचेंग यांनी या लेखात म्हटले आहे.
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे आधीच दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर बोजा आहे. अशात चिनी वस्तूंचा विरोध करुन भारतातील मध्यमवर्गीयांवरील ओझं आणखी वाढणारच आहे. कारण परवडणाऱ्या बहुतांश वस्तू भारत चीनमधूनच आयात करतो, असं चीनचं म्हणणं आहे. चिनी इन्स्टिट्यूट ऑफ कन्टेम्पररी इंटरनॅशनल रिलेशनच्या साऊथ एशियन इन्स्टिट्यूटचे डेप्युटी डायरेक्टर लोऊ चुन्हाऊ यांच्या मते, सध्या चिनी वस्तूंवर बहिष्कार घालणं भारतीयांसाठी शक्यच नाही. ते म्हणाले की, मोदी सरकारला भारताची पायाभूत सुविधा पुन्हा एकदा उभी करायची आहे आणि चिनी वस्तूंचा बहिष्कार करुन हे शक्य नाही. दरम्यान भारतीय स्मार्टफोन मार्केटचा 72 टक्के भाग चिनी कंपन्यांच्या ताब्यात आहे. टीव्ही मार्केटच्या बाबतीत 45 टक्के तर दैनंदिन वस्तूंच्या बाबतीत ही भागीदारी 70 ते 80 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते.