पुणे (वृत्तसंस्था) – बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र मान्सूनच्या वाटचालीस पूरक ठरण्याचे संकेत आहेत. त्यामुळे मान्सून मंगळवारपर्यंत तळकोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात जे कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे, त्याचे रूपांतर वादळात होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
बंगालच्या उपसागराकडे नजर
वादळाचा पहिला टप्पा म्हणजे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणे. परंतु, प्रत्येक कमी दाब क्षेत्राचे रुपांतर वादळात होत नाही. तर, बंगालच्या उपसागरात जे कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे, त्याचे रूपांतर वादळात होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढे तीन ते चार दिवस हवामान खात्याची नजर बंगालच्या उपसागरात होणाऱ्या बदलांवर राहणार आहे. त्यानुसार ऍलर्टसुद्धा जारी करण्यात येईल.
दरम्यान,रविवारी मान्सूनने तामिळनाडूचा बहुतांशी भाग, अंतर्गत कर्नाटकचा काही भाग आणि आंध्र प्रदेशाच्या रायलसिमा भागात प्रगती केल्याचे हवामान विभागान जाहीर केले. गुरूवारी मान्सूनने पश्चिम किनारपट्टीवर वाटचाल करत संपूर्ण केरळ व्यापला. त्यानंतर कर्नाटकची संपूर्ण किनारपट्टी व्यापून मान्सून वारे गोव्याच्या उंबरठ्यावर दाखल झाले आहेत. यातच बंगालच्या उपसागरात मंगळवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. हे क्षेत्र पोषक ठरून मान्सूनची वेगाने वाटचाल होण्याची शक्यता आहे. कोकणात दाखल होताच, महाराष्ट्राच्या इतर भागातही मान्सून वेगाने प्रगती करण्याची शक्यता आहे.