नवी मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात करोनाचे संकट असताना पोलीस आपल्या जीवाची बाजी लावून कर्तव्य बजावत आहे. यामध्ये अनेक पोलिसांनाही करोना झाला. मात्र, मागे न हटता पोलीस करोनाशी दोन हात करत आहेत. अशामध्ये पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आवर्जून पोलिसांच्या भेटी घेत आहेत.
पुण्यावरुन मुंबईला जाताना एक्सप्रेस हायवेवर किवळे फाटा येथे पोलिसांचा बंदोबस्तजवळ गृहमंत्र्यांचा ताफा थांबला आणि अनिल देशमुख यांनी पोलिसांशी संवाद साधला. यावेळी अनिल देशमुख यांना कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांचा आज वाढदिवस असल्याचे समजले. यावेळी अनिल देशमुख यांनी केक आणण्यास सांगून पोलिसांच्या गाडीवरच श्रीकांत जाधव यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला व त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्वतः गृहमंत्र्यांनी श्रीकांत जाधव यांना केक भरवला. यामुळे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांच्यासह सर्वच अधिकारी आणि कर्मचारी भारावून गेले होते.