पुणे (वृत्तसंस्था) – ‘लॉकडाऊन काळात कामगार त्यांच्या गावी परत गेले’. त्यामुळे आता रोजगाराची संधी उपलब्ध होणार, असे सोशल मीडियावर मेसेज टाकले जात आहे. ‘या कंपनीमध्ये पदभरती सुरू आहे’, ‘याठिकाणी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.’ एवढच नव्हे तर जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, पाटबंधारे विभाग या शासकीय कार्यालयातही पदभरती सुरू असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र, तरुणांनो सावध…! पदभरतीच्या नावाखाली आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे.
‘जिल्हा परिषद, पुणे येथे सनदी लेखापाल पदाच्या 1416 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे,’ असा आशयाची जाहिरात मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहे. त्यामध्ये पदाचे नाव, संख्या, पत्ता, अर्ज भरण्याची शेवटची तारीख यासह लिंक देण्यात आली आहे. मात्र, त्या जाहिरातीवर कोठेही जिल्हा परिषद कार्यालयाचा सही, शिक्का नाही. त्यांचे अधिकृत पत्र नाही. त्यामुळे अनेक तरुणांसह नागरिकांचे जिल्हा परिषद कार्यालयात भरती संदर्भात चौकशीचे फोन सुरू झाले. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी तत्काळ कार्यवाही करत ही जाहिरात ‘फेक’ असल्याचे स्पष्ट केले.
बॅंका, साखर कारखाने, एमआयडीसीमधील कंपन्या, आयटी कंपनी, कॉर्पोरेट ऑफिस, रेल्वे, एसटीसह शासकीय विभागांत पदभरती सुरू, असे मेसेज व्हायरल होत आहेत. त्यामध्ये अर्ज भरण्यास सांगितले जाते. ज्यावेळी उमेदवार या जाहिरातीवर विश्वास ठेवून अर्ज भरतो, त्यावेळी अर्ज सबमिट करण्याआधी काही शुल्क आकारले जाते. ते ऑनलाइनच भरायचे असते, त्यामुळे अनेक उमेदवार हे शुल्क भरतात. मात्र, प्रत्यक्षात ती लिंक बनावट किंवा जुनी असते. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्या उमेदवाराला उशिरा समजते.
लॉकडाऊनमध्ये अनेकांचे रोजगार गेले. तर परराज्यातील लाखो नागरिक पुणे-मुंबई सोडून त्यांच्या मूळगावी गेले. त्याचाच फायदा घेत काही समाजकंटक सोशल मीडियावर ‘भविष्यात रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे’ असे मेसेज टाकून बेरोजगारांना आशा दाखवत आहे. या खोट्या जाहिरातींमध्ये पैसे उकळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे तरुणांनी जाहिरातीची खातरजमा झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये. कोणी भेटण्यासाठी बोलवत असेल तर जाऊ नका, भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.