नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जगात कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. जगभरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढून 70 लाखांच्या पार पोहोचला आहे. तसेच या महामारीच्या विळख्यात अडकून मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 4 लाखांहून अधिक झाली आहे. त्यामुळे जगात कोरोनाचा कहर काही केल्या कमी होताना दिसत नाही.
वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील 213 देशांमध्ये सोमवारी सकाळपर्यंत एकूण 70 लाख 81 हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 4 लाख 5 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 34 लाख 55 हजार 099 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनामुळे सर्वाधिक प्रभाव हा जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेवर झाला आहे.
अमेरिकेमध्ये एकूण 1 लाख 12 हजार 469 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोना बाधितांचा आकडा 20 लाख 07 हजार 449 वर पोहोचला आहे. त्यानंतर कोरोना बाधितांची सर्वाधिक संख्या ब्राझीलमध्ये आहे. ब्राझीलमध्ये 6 लाख 91 हजार 962 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर रुसमध्ये 4 लाख 67 हजार 673 रुग्ण आढळले असून रुस तिसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. ब्राझीलनंतर रूस आणि भारतात संसर्ग झालेल्यांची संख्या वेगाने वाढत आहे.