मुंबई (वृत्तसंस्था) – राष्ट्रवादी काँग्रेस नेते तसेच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात फेसबुकवर पोस्ट केल्याने ठाण्यातील एका तरूण अभियंत्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अनंत कानमुसे असं मारहाण झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड विरोधात पोस्ट केल्याने आव्हाड यांच्या सुरक्षारक्षकांनी तसेच पोलिसांनी मला बंगल्यावर नेऊन मारहाण केली आहे असा आरोप पीडित तरूणाने केला आहे. याबाबत वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.रविवारी 5 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर फटका बसलेल्या गरीब नागरिकांसाठी दिवे लावण्याचं आवाहन केले होते. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला जितेंद्र आव्हाड यांनी विरोध दर्शवत ट्विटरद्वारे एक व्हिडीओ शेअर केला होता. आव्हाड यांनी शेअर केलेल्या व्हिडीओनंतर सदरील तरूणाने त्यांच्याविरोधात फेसबुकवर पोस्ट टाकली होती. त्यानंतर त्याच दिवशी रात्री दोन पोलीस आणि दोन सुरक्षारक्षकांनी सदरील तरूणाला जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण केली. आणि फेसबुकवर केलेली पोस्ट डिलीट करायला लावली. तसेच या तरूणाकडून माफीचा सुद्धा मागून घेण्यात आली. या गोष्टीचा व्हिडीओ तयार करण्यात आला असल्याची तक्रार सदरील तरूणाने पोलिसात दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून प्रकरणाचा शोध सुरू केला आहे.