पुणे (वृत्तसंस्था) – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट व बार बुधवार, गुरुवार व शुक्रवार हे तीन दिवस बंद राहणार आहेत. याबाबत पोलीस आयुक्तालयात मंगळवारी हॉटेल व्यावसायिकांची बैठक झाली. यावेळी पोलिसांनी हॉटेल व्यावसायिकांना हॉटेल बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला व्यावसायिकांनी प्रतिसाद देत मंगळवारपासून काही हॉटेल बंद केली. तसेच, अनेक ठिकाणी पोलीस स्वतः व्यावसायिकांना हॉटेल बंद करण्याचे आवाहन करत होते. या बैठकीस पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पुणे रेस्टॉरंट आणि हॉटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. करोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडूनही युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. शहरातील हॉटेलमध्ये नागरिकांची गर्दी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला, असे हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी सांगितले.