ब्रिस्टल (वृत्तसंस्था) – इंग्लंडच्या ब्रिस्टल शहरात शुक्रवारी पडणाऱ्या पावसात उभ्या असलेल्या युवकांना बघणे वेगळाच अनुभव होता. सुमारे ३० हजार युवक वातावरण बदलाविरोधात रॅलीत सहभागी होण्यासाठी देशभरातून दाखल झाले होते. फ्रायडेज फ्यूचर मोहिमेअंतर्गत पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गने या रॅलीचे आवाहन केले होते. यात शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, युवक आणि लहान लहान मुलेही आई-वडिलांसोबत सहभागी झाले. सकाळी ग्रीन कॉलेजच्या बाहेर सर्वजण जमले. त्यानंंतर संपूर्ण शहरात रॅली निघाली. निदर्शकांनी फलक घेतले होते, त्यावर ‘निसर्ग बदलत असल्यास आपण का बदलत नाही, समुद्राचा आकार वाढतोय’ असे संदेश लिहिले होते. या वेळी जगभरातील सरकारांविरोधात घोषणाबाजी झाली- सरकारांनो जागे व्हा, आम्हाला बुडायचे नाही. आताच सावरा. दुसरी संधी नाही.
रॅलीसाठी एका खासगी कंपनीने ऑक्सफोर्ड, बर्मिंगहॅमसह अनेक शहरांमधून लोकांना ब्रिस्टल आणण्याची सोय केली. हजारो मुले शाळेला सुटी देऊन आले. ग्रेटा या रॅलीसाठी रेल्वेने इंग्लंडला आली. तर रॅलीच्या ठिकाणी येण्यासाठी इलेक्ट्रिक कारचा वापर केला. ग्रेटाने युवकांसोबत ब्रिस्टलच्या सिटी संेटरपर्यंत मार्च काढला. त्यानंतर भाषणात म्हणाली, कोणत्याही देशाचे सरकार पर्यावरण संकटाबाबत गंभीर नाही. ते थांबवण्यासाठी काहीच होत नाहीये. ज्यांना निवडून दिले त्यांच्या घोषणा खोट्या निघाल्या. जगात आग लागली असेल तर आम्ही शांत बसू शकत नाही, काहीतरी करावे लागेल.