मुंबई (वृत्तसंस्था) – मुंबईत कोरोना वायरसचा प्रसार वाढताना दिसत आहे. त्यामुळे रुग्णांची संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या सर्व परिस्थितीमुळे मुंबईकर चिंतेत आहेत. यातच नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम कडक पाळा, असे पालिका सांगत आहे. नागरिक वाढता धोका लक्षात घेता भाजीपाला खरेदी करतानाही खबरदारी म्हणून मास्क लावणे, वेळोवेळी हात धुणे, रोज वापरात येणाऱ्या वस्तूंचे सॅनिटायझर करणे या सर्व बाबी काटेकोरपणे पाळत आहेत.
शिवडी पूर्व येथील कोळीवाड्यात मात्र, बुधवारी दुपारी एका भाजी विक्रेत्याने कचराकुंडीत फेकलेल्या भाजीची गोणी उचलून ती सडलेली भाजी हातगाडीवरून विभागातील नागरिकांना विकल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याची माहिती व व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी काढून तो समाजमाध्यमावर प्रसारित केला होता. ही माहिती स्थानिक नागरिक रुपेश ढेरंगे यांना मिळताच त्यांनी या भाजी विक्रेत्याला चांगलीच समज देत ती भाजी कुठून आणली? तसेच सडलेले का विकतो? अशी विचारणा केली त्यानंतर भाजी फेकून देण्यास सांगताच संबंधित विक्रेत्याने जवळील कचराकुंडीत सर्व भाजी फेकली. यावेळी त्याने तोंडाला मास्क देखील लावलेले नव्हते. यामुळे कोणतीही वस्तू खरेदी करताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.