पुणे (वृत्तसंस्था) – करोना व्हायरसचा प्रादुर्भाव होत असताना सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यानंतर आता काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन हटविण्यात आले आहे; परंतु पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन कायम ठेवण्यात आले आहे. शासनाने परप्रांतीयांना गावी जाण्यासाठी बसेस व रेल्वेची व्यवस्था करणार असल्याचे जाहीर केले असल्याने आरोग्य प्रमाणपत्र घेण्यासाठी परप्रांतीयांची मोठ्या संख्येने गर्दी होऊ लागली आहे.
जिल्ह्यात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर शिरूर तालुक्यातील कंपन्या व कारखाने बंद झाले आहेत. त्यामुळे कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांवर मोठे संकट उभे राहिले आहे. महिनाभर कसेबसे दिवस काढले. तीन मे रोजी लॉकडाऊन संपणार, या आशेवर सर्व मजूर व नागरिक बसले होते; परंतु काही ठिकाणचे लॉकडाऊन हटविण्यात आले. पुणे जिल्ह्यामध्ये पुन्हा अचानकपणे काही लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. त्यामुळे सर्व परप्रांतीय नागरिक, बाहेर जिल्ह्यातील नागरिक व कामगारांची निराशा झाली आहे.
दरम्यानच्या काळामध्ये सर्व परप्रांतीय नागरिकांना गावी जाण्यासाठी शासन सुविधा करणार असल्याचे सांगत त्यांच्याकडून अर्ज भरून घेतले गेले. त्यावर अद्यापपर्यंत कोणताही तोडगा काढला गेला नाही. त्यामुळे असंख्य परप्रांतीयांनी गावी पायी जाण्याचा मार्ग अवलंबविला होता.
सध्या गावी जाण्याची सोय होणार असल्यामुळे परप्रांतीयांसह बाहेर जिल्ह्यातील नागरिक आरोग्य प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात गर्दी करीत आहेत. सकाळपासूनच मोठ्या रांगा लावत आहे. परप्रांतीयांना गावी जाण्याची ओढ लागलेली असल्यामुळे त्यांचा संयम सुटण्याच्या मार्गावर आहे. शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय येथे सकाळपासूनच परप्रांतीयांच्या मोठ्या रांगा लागल्याचे दिसून आले.
ग्रामीण रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण गरजेचे
नागरिकांसाठी वरदान ठरलेले शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय हे सर्व सामान्यांच्या आशेचा किरण बनले आहे; परंतु अचानकपणे मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांची गर्दी येथे होत असल्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयात औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.







