पुणे (वृत्तसंस्था) – शादी डॉटकॉमवरून ओळखकरून त्यांना लग्न करण्याचे तसेच भागीदारीत व्यावसाय करण्याच्या बहाण्याने महिलेची तबल 49 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मार्च 2019 ते जून 2020 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी 49 वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बँक खातेधारक आणि वापरकर्ते तसेच डेनिस जेम्स, रिचर्ड डिव्हिजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या एका खासगी कंपणीत नोकरी करतात. त्या राहण्यास धानोरी भागात आहेत. त्यांनी जीवनसाथी आणि शादी डॉटकॉमवर नोंदणी केली होती. त्यादरम्यान आरोपींनी त्यांना यावरून संपर्क साधला. तसेच ओळख करून त्यांच्याशी मैत्री वाढवली. मैत्री वाढविल्यानंतर विवाह करण्याचे अमिश दाखविले. त्यांना आपण व्यावसायिक असल्याचे सांगितले.
त्यानंतर भागीदारीत व्यावसाय करू असे सांगत विश्वास संपादन केला. त्यासाठी त्यांना काही पैसे लागतील अशी खोटी माहिती दिली. तर त्यांच्याकडून वेगवेगळी कारणे सांगून वेळोवेळी एकूण 49 लाख 15 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. पण पैसे घेऊन देखील त्यांना व्यवसाय सुरू करण्याबाबत किंवा लग्नाबाबत काही एक न बोलता पैशांची मागणी करण्यात येत होती. यावेळी त्यांना फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. या तक्रारीची प्राथमिक चौकशी सायबर पोलिसांनी केली. त्यावेळी फिर्यादी यांची फसवणूक झाली असल्याचे समोर आले. त्यानंतर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक अरुण आव्हाड हे करत आहेत.
दरम्यान फिर्यादी यांना आरोपींनी एका वर्षात वेगवेगळ्या तबल 28 बँक खात्यावर पैसे भरण्यास भाग पाडले आहे. सर्व बँक खाती परदेशातले आहेत. आता त्यांची माहिती काढून पैसे मिळवणे पोलिसांसाठी अडचणी येणार आहेत. सायबर पोलिसांकडून सतत अनोखी व्यक्तीच्या भूलथापांना बळी पडू नये असे आव्हान करणयात येते. तर सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून देखील जास्त वैयक्तिक माहिती वा बँकेशी संबंधित माहिती न देण्याचे आवाहन केले आहे.