पाचोरा (प्रतिनिधी)
(पाचोरा) तातडीची उपाययोजना म्हणून उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, नगरपालिका, विघ्नहर्ता हॉस्पीटल, ग्रामीण रुग्णालय पाचोरा यांचेतर्फे संयुक्तीरित्या पाचोरा शहरातील विघ्नहर्ता हॉस्पीटल अधिग्रहीत करुन येथे रुग्णांकरीता 50 बेडस् चे कोव्हीड 19 केअर सेंटर कार्यान्वीत करण्यात आलेले आहे.
या सुसज्ज कोव्हीड 19 केअर सेंटरमध्ये प्रामुख्याने 50 बेडस्, पिण्याचे शुध्द पाणी, शौचालय, सॅनीटायझर, हात धुण्यासाठी साबण, मास्क, ऑक्सीजनची व्यवस्था करण्यात आलेली असून सोडीयम हायपोक्लोराईड ने फवारणी करुन कोव्हीड सेंटर परिसर पुर्णपणे निर्जुंतूक करण्यात आलेला आहे. पुढील काळात विषाणूंचा धोका निर्माण झाल्यास प्रतिबंध म्हणून तालुका प्रशासन व नगरपालिकेकडून उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत. गरज पडल्यास शहरातील इतर मंगल कार्यालये, लॉन्स देखील अधिग्रहीत करण्यात येईल असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
या वेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसिलदार कैलास चावडे, तालुका वैद्यकिय अधिकारी समाधान वाघ, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, विघ्नहर्ता हॉस्पीटलचे संचालक डॉ.भुषण मगर, कर निरीक्षक दगडू मराठे आदी उपस्थित होते.