जळगाव (प्रतिनिधी) अमळनेर येथील दाम्पत्यानंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय रूग्णालयात एका वृध्दाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
अमळनेर येथील दाम्पत्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून यातील महिलेचा मृत्यू झाला आहे तर तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत. यातच आता अमळनेरच्या ७३ वर्षीय वृध्दाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
संबंधीत वृध्द व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याला दिनांक २० एप्रिल रोजी जिल्हा शासकीय वैद्यकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची स्वॅब चाचणी करण्यात आली होती. आज पहाटे दीड वाजेच्या सुमारास याचा अहवाल प्राप्त झाला असून यात हा रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.