नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – करोनाग्रस्त रुग्णांची वाढत्या संख्येमुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. करोना व्हायरसमुळे अमेरिकेत २२ लाख आणि ब्रिटनमध्ये ५ लाखांपेक्षा अधिक मृत्यू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. लंडनच्या इम्पीरियल कॉलेजचे प्रोफेसर नील फर्ग्युसन यांच्या अध्यक्षतेखाली हा स्टडी अहवाल तयार करण्यात आला आहे.प्रोफेसर नील यांनी हा अहवाल तयार करण्यासाठी इटली आणि नुकत्याच वाढलेल्या करोना प्रकरणातील डेटा वापरला आहे. तसेच, यामध्ये करोनाच्या प्रभावाची आणि १९१८ मध्ये पसरलेल्या फ्लूच्या परिणामाची तुलना केली आहे. अभ्यासकांनी सांगितले कि, याक्षणी करोना ही गंभीर समस्या आहे, ज्यामुळे अमेरिकेत २२ लाख आणि ब्रिटनमध्ये ५ लाखांहून अधिक लोक मृत्यू होण्याची शक्यता आहे. या स्थितीला रोखण्यासाठी आणखी कडक उपाय-योजना प्रभावीपणे राबवायला पाहिजे. कोरोनामुळे आरोग्य सेवेवर मोठा भार पडणार असल्याचे ही या संशोधनात म्हटले आहे. कोरोनाचा प्रभाव कमी होईपर्यंत लोकांनी पब, क्लब आणि थिएटरमध्ये न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असेही सांगितले आहे.दरम्यान, इराणमध्ये करोनाचा फैलाव अत्यंत वेगाने होत असून आतापर्यंत १६ हजारहून अधिक जणांना करोनाची लागण तर ९८८ इतके मृत्यू झाले आहे. अशातच देशातील एका विद्यापिठातील संशोधकांनी करोनाच्या साथीमुळे केवळ इराणमध्येच ३३ लाख लोकं मरण पावण्याची शक्यता व्यक्त केली आहे.