पुणे (वृत्तसंस्था) – नारायणगाव -पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारची मंजुरी मिळावी, यासाठी (दि. 5) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. पवार यांनी अनुकूल प्रतिसाद दिल्यामुळे प्रकल्पाला गती मिळणार असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

वर्षभरापासून रेल्वे मंत्रालयाकडे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. डीपीआरला मंजुरी मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू होता. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात प्रयत्न केला होता. प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्याने अखेर यश मिळाले आहे. महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जैस्वाल यांना प्रकल्पाचे सादरीकरण केले.
यावेळी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, परिवहनचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष सिंह, नियोजनचे अतिरिक्त मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव राजीव जाधव, खासदार डॉ. कोल्हे आदी उपस्थित होते. यावेळी तीनही विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी येणारा खर्च व अन्य तांत्रिक बाबींवर चर्चा केली.







