इस्लामाबाद (वृत्तसंस्था) – 1993 मधील मुंबईत साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला करोनाची लागण झाल्याचे वृत्त शुक्रवारी आले होते. मात्र, आता दाऊदचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. न्यूज एक्सने सुत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. पण, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
दाऊदसोबतच त्याच्या पत्नीलाही करोना संसर्ग झाल्याचे समजते. दाऊदला कराचीमधील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. त्याच्या घरातील सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांनाही क्वारंटाइन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, दाऊदचा भाऊ अनीसने हे वृत्त फेटाळून लावलं आहे.
दरम्यान, दाऊद इब्राहिम हा सध्या पाकिस्तानात नसल्याची माहिती ब्रिटनमधील एका न्यायालयाला मागील वर्षी पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने दिली होती. मात्र, दाऊदला करोना झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर आता पाकिस्तानने या वृत्ताला दुजोरा दिल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा विरोध सहन करावा लागणार आहे. तसेच दाऊदला भेटलेल्या व्यक्तींचे करोना चाचणीचे निकाल सकारात्मक आले तर पाकिस्तान मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.