मुंबई (वृत्तसंस्था) – देशव्यापी लॉकडाऊन घोषित केल्यानंतर गंगा नदीचे पाणी स्वच्छ होत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये झळकत आहेत. अशातच आज गंगा नदीचे पाणी स्वच्छ होण्यामागील शास्त्रीय कारणांचा उलगडा करताना वाराणसी येथील आयआयटी महाविद्यालयातील केमिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक पी के मिश्रा यांनी लॉकडाऊनमुळे बंद करण्यात आलेले औद्योगिक कारखाने गंगा नदीच्या पाण्याची पत सुधारण्यास मदत करत असल्याचे सांगितले. तत्पूर्वी, कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे देशात 22 मार्चपासून तीन आठवड्यांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे देशातील 130 कोटी नागरिक घरातच आहेत. गंगा नदीच्या पाण्याचा दर्जा मोठ्या प्रमाणात स्वच्छ झाल्याचे बहुतांश देखरेख केंद्रांना आढळून आल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) माहितीवरून स्पष्ट झाले होते. यालाच प्राध्यापक पी के मिश्रा यांनी दुजोरा दिला असून गंगा नदीच्या पाण्यामध्ये ४० ते ५० टक्क्यांनी सुधारणा आली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सीपीसीबीच्या 36 देखरेख केंद्रांनी गंगा नदीचे पाणी विविध ठिकाणांवरून गोळा केले. सुमारे 27 बिंदूंच्या आधारे हे पाणी अंघोळ, तसेच वन्यजीव व मत्स्यांच्या प्रसारासाठी योग्य दर्जाचे असल्याचे सीपीसीबीने अहवालात म्हटले आहे.विरघळलेला प्राणवायू, जैवरासायनिक प्राणवायूची गरज, एकूण कोलीफॉर्म, पीएच पातळी हे निकष पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी वापरण्यात आले. लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून गंगेच्या पाण्याचा दर्जा सुधारला आहे. विशेषत: औद्योगिक भागांमध्ये गंगेचे पाणी आता शुद्ध झाले, असे तज्ज्ञांनी सांगितले. उद्योगांकडून होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण तपासण्याची सीपीसीबीला सध्या संधी असल्याची प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमी मनोज मिश्रा यांनी व्यक्त केली. योग्य माहितीच्या आधारे पाणी स्वच्छ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्योगांकडून होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण तपासण्याची संधी सीपीसीबीला प्राप्त झाली आहे. त्याआधारे केंद्रीय नियंत्रण मंडळ उपाययोजना करू शकेल, असे त्यांनी सांगितले.