पुणे (वृत्तसंस्था) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना करोनाच्या पार्श्वभूमीवर साधन सामग्री उपलब्ध करून न दिल्यामुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षा ‘राम भरोसे’ असल्याचेच समोर आले आहे. ठेकेदारांच्या हिताचे निर्णय घेणारे आरोग्य विभागातील अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांकडे इतके दुर्लक्ष करूच कसे शकतात, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सध्या करोनाचे रुग्ण वाढत आहेत. या परिस्थितीतही महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसह वैद्यकीय, सुरक्षारक्षक, वाहतूक नियंत्रणासाठी नियुक्त केलेले कर्मचारी, स्मशानभूमीतील महापालिकेचे कर्मचारी तसेच आपत्कालीन परिस्थितीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. अत्यंत किरकोळ प्रमाणात सुरुवातीला काही जणांना उपलब्ध करून देण्यात आलेली साधनेही खराब झाल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे.मास्क, सॅनिटायझरसह सुरक्षा किट महापालिकेने उपलब्ध करून देण्याची गरज असताना ही जबाबदारी असलेला आरोग्य विभाग मात्र ठेकेदारांना पोसण्यातच अद्यापही मश्गुल आहे. संचारबंदी आणि लॉकडाऊन असताना हा विभाग शेकडो कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आदेश देण्यातच धन्यता मानत असल्याने जे कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी अथवा त्यांना सुरक्षा साधने पुरविण्यासाठी या विभागातील अधिकाऱ्यांकडे वेळच नसल्याची बाब समोर आली आहे. शहरातील साफसफाई, ड्रेनेज, पाणीपुरवठा, विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांसह वैद्यकीय विभागाचे कर्मचारी, करोनासाठी नियुक्ती करण्यात आलेले शिक्षक, ट्रफिक वॉर्डन, शहरातील पोलीस कर्मचारी, सुरक्षा कर्मचाऱ्यांसह हजारो कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने मिळत नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. या कर्मचाऱ्यांचा उद्रेक झाल्यास वेगळीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आरोग्य विभागाचे डॉ. अनिल रॉय यांना या प्रकाराबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी फोन केला असता प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही. वारंवार फोन करूनही फोन न घेता आपण बेजबाबदार आणि बेफिकीर असल्याचेच त्यांनी दाखवून दिले.