पुणे (वृत्तसंस्था) – लष्कर परिसरातील कॉन्व्हेंट रस्ता परिसरात बेकायदेशीर वृक्षतोडप्रकरणी घरमालकास दोषी ठरवत, त्याला 15 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच 35 नवीन झाडे लावण्याचे आदेशही बोर्डाच्या पर्यावरण समितीने दिले आहेत.
लष्कर परिसरातील घर क्रमांक 1996 येथील चार झाडे तोडण्याची परवानगी बोर्डाने जुलै 2019 मध्ये दिली होती. मात्र, प्रत्यक्षात येथील सात झाडे तोडली गेली असून, तीन झाडे ही बेकायदेशीररित्या तोडण्यात आल्याची तक्रार परिसरातील रहिवासी ज्ञानेश्वर कांबळे यांनी ऑगस्ट 2019 मध्ये केली होती. हे प्रकरण नगरसेवक दिलीप गिरमकर यांच्या अध्यक्षतेखालील बोर्डाच्या पर्यावरण समितीसमोर सुनावणीसाठी आल्यानंतर उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी संबंधित परिसराची पाहणी करून, त्याचा अहवाल सादर केला. या अहवालानुसार मालमत्ताधारकाने चिकू, कढीपत्ता आणि चेरी अशी तीन झाडे बेकायदेशीररित्या तोडल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार समितीने संबंधित मालक असलेल्या प्रोव्हिन्शिअल सोसायटी ऑफ द कॉन्ग्रीगेशन ऑफ जीजस ऍन्ड मेरी या संस्थेला बेकायदेशीर वृक्षतोडप्रकरणी दोषी ठरवत प्रत्येकी पाच हजार याप्रमाणे तीन झाडांसाठी पंधरा हजार रुपयांचा दंड लावला आहे. तसेच संस्थेने बेकायदेशीरपणे तोडलेल्या झाडांच्या बदल्यात 15, तर परवानगीपूर्वक तोडलेल्या झाडांच्या बदल्यात वीस अशी एकूण 35 नवीन झाडे लावण्याचे आदेशही दिले आहे. याबाबत संस्थेनेही सहमती दर्शविली आहे.दरम्यान, कॅन्टोन्मेंट कायदा 2006मध्ये वृक्षतोड प्रतिबंध आणि पर्यावरण संवर्धनाबाबत फारशी स्पष्टता नाही. यामुळे पर्यावरण संवर्धनासंदर्भात एखादा निर्णय घेताना अडचणी येत असतात. विशेषत: वृक्षतोड रोखण्यासाठी ठोस कायदे आवश्यक असल्याचे पर्यावरण समितीकडून नमूद करण्यात आले आहे.