नवी दिल्ली (वृत्तसंथा) – निर्भया दोषींच्या तिसऱ्या डेथ वॉरंटला लागू करण्यासाठी केवळ चार दिवस बाकी असतानाच एक गुन्हेगार असलेल्या पवन गुप्ताने चाल खेळली. शुक्रवारी त्याने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह अर्ज दाखल करून फाशीच्या शिक्षेला जन्मठेपेत परिवर्तित करण्यासाठी आर्जव केले. त्याला फाशीची शिक्षा केली जाऊ नये, असा युक्तीवाद त्याचे वकील ए.पी. सिंह यांनी केला. या प्रकरणात सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास दोषी पवनकडून बचावाचा अंतिम कायदेशीर पर्याय म्हणून राष्ट्रपतींकडे दया याचिका केली जाऊ शकते. त्यामुळे फाशीची तारीख टाळून डेथ वॉरंट जारी करावी लागेल, अशी शक्यता जास्त दिसते.
पवन गुप्ताकडे दया याचिकेचा पर्याय शिल्लक आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने १७ फेब्रुवारी रोजी चारही दोषी- मुकेश, अक्षय, विनय व पवन गुप्ताला फाशीची शिक्षा देण्यासाठी ३ मार्चचे डेथ वाॅरंट जारी केले होते. तत्पूर्वी ७ व १७ जानेवारीला जाहीर डेथ वॉरंटवर गुन्हेगारांनी चाल खेळत दोन वेळा फाशीची शिक्षा टाळली. तीन दोषी मुकेश, विनय व अक्षयच्या बचावासाठी सर्व कायदेशीर पर्याय आता संपले आहेत. केवळ पवनकडे क्यूरेटिव्ह व राष्ट्रपतीकडे दया याचिका दाखल करण्याचा पर्याय शिल्लक आहे.