पुणे (वृत्तसंस्था) – सलग 40 दिवसांच्या लॉकडाऊननंतर पुणे शहरातील बंधने काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. याबद्दलचे आदेश रविवारी उशिरा महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले. यातून करोना संसर्गबाधित क्षेत्र वगळता शहरातील अन्य भागांत बऱ्याच अंशी सवलती देण्यात आल्या आहेत. या आदेशाची माहिती मिळताच सोमवारी सकाळपासून पुणेकरांनी नेहमीप्रमाणे तुफान गर्दी केली. शहरातील बरेच रस्ते वाहनांच्या गर्दीत हरवल्याचे दिसून आले. संचेती पुलावरून जंगली महाराज रस्त्याकडे येणाऱ्या मार्गावरही मोठी रहदारी दिसून आली. त्यामुळे कोरोना संसर्गाची भीती कमी झाली की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.