न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) – अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सध्या सर्वत्र हिंसक आंदोलने सुरु आहेत. या हिंसाचारादरम्यान महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली. वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दुतावासाबाहेर महात्मा गांधींचा पुतळा आहे. काही असामाजिक तत्वांकडून या पुतळयाची विटंबना करण्यात आली. युनायटेड स्टेटस पार्क पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. दरम्यान, या प्रकरणी अमेरिकेने माफी मागितली आहे.
वॉशिंग्टन डीसीमध्ये असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची काही असामाजिक तत्त्वांकडून विटंबना करण्यात आली ही अतिशय दु:खद घटना आहे. आम्ही याबाबत खेद व्यक्त करतो. तसंच या प्रकरणी माफी मागतो, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे भारतातील राजदुत केन जस्टर म्हणाले. दरम्यान अमेरिकेत सुरू असलेल्या हिंसाचारावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षे डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच ज्या ठिकाणी विरोधकांची सत्ता आहे त्याच ठिकाणी अधिक हिंसाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर फक्त अमेरिकेतच नव्हे तर जगभरात निदर्शनांच्या माध्यमातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेत होणाऱ्या आंदोलनांचे स्वरुप उग्र, हिंसक आहे. पॅरिस, सिडनी, अर्जेंटिना, ब्राझील, कॅनडा आणि न्यूझीलंड यांसारख्या ठिकाणी तर नागरिकांनी रस्त्यावर उतरुन आपला निषेध नोंदवला.







