तीन जणांना पोलिसांनी केली अटक
जळगाव (प्रतिनिधी) – जुन्या एमआयडीसी तील समृध्दी केमिकल कंपनीत केमिकल युक्त पाणी आणि गाळ तकीमधून काढताना तीन जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली होती . याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . यात कंपनीचे संचालक सुबोध चौधरी, सुनिल चौधरी आणि सुयोग चौधरी असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जुन्या एमआयडीसीतील ए-सेक्टरमध्ये प्लॉट क्र्. ८४, ८५ मध्ये सुबोध सुधाकर चौधरी व सुयोग सुधाकर चौधरी यांच्या मालकीची समृद्धी केमिकल्स नावाची रासायनिक खत निर्मिती करण्याची कंपनी आहे. अपर्णा सुयोग चौधरी यांच्या नावावर ही कंपनी आहे. शनिवारी कंपनीला सुट्टी असल्याने मालक सुबोध चौधरी यांनी मयूर विजय सोनार व दिलीप सोनार यांना कंपनीचे वेस्टेज केमिकल्स व सांडपाणी साठवण्याची टाकी साफसफाई करण्यास सांगितले होते.
या टाकीत केमिकल मिश्रित चिखल व गाळ होता. टाकीत साफसफाई करीत असताना मयुर विजय सोनार (३५, रा. कांचन नगर) यांचा वरुन पाय घसरला व तो या सांडपाण्यात बुडाले. हा प्रकार लक्षात येताच दिलीप अर्जुन सोनार (५४, रा. कांचन नगर, मुळ रा. खिरोदा, ता.रावेर) यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. टाकीतून हात धरून ओढत असताना कोळी हेच खाली खेचले गेले व त्यामुळे ते देखील टाकीत बुडाले. ठेकेदार रवींद्र उर्फ गोटू झगडू कोळी (३२, रा. चिंचोली, ता.यावल) हे दोघांना वाचविण्यास गेले असता, तेही टाकीत बुडाला. अवघ्या दहा मिनिटात तिघे या टाकीत बुडाले. इतर कामगारांनी तातडीने धाव घेऊन तिघांना बाहेर काढले. मालवाहू टेम्पो मधून जिल्हा रुग्णालयात आणले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी त्यांना मृत घोषित केले होते. एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रामकृष्ण पाटील यांनी पंचनामा तसेच चौकशी केली होती. चौकशीत संबंधित केमिकलचे सांडपाणी असलेल्या चेंबरमध्ये विषारी वायु तयार होतो. हे माहित असतांनाही कंपनीच्या मालकांनी कुठलेही सुरक्षेची उपाययोजना न करता, तसेच टाकी स्वच्छ करणार्या कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने कुठलेही कपडे अथवा साहित्य न देता चेंबरमध्ये उतरविले. व त्यात त्यांचा मृत्यू झाला असे चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर पोलीस उपनिरिक्षक रामकृष्ण पाटील यांच्या फिर्यादीवरुन शनिवारी रात्री एक वाजेच्या सुमरास सुबोध सुधाकर चौधरी, हिरा सुबोध चौधरी, अपर्णा सुयोग चौधरी, सुनील सुधाकर चौधरी, सुयोग सुधाकर चौधरी सर्व रा. सागर नगर, एमआयडीसी या पाचही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यात सुबोध चौधरी, सुनील चौधरी व सुयोग चौधरी या तिघांना अटक करण्यात आली आहे.