नवी दिल्ली : भारतात कोरोनाचे नवे 35 बाधीत शनिवारी आढळले. त्यामुळे देशातील बाधितांची संख्या 298 वर पोहोचली आहे. त्यामुळे बाधितांचा परिणामकारक शोध घेण्यासाठी भारतीय वैद्यक संशोधना परिषदेने (आयसीएमआर) चाचणी धोरणाची नवी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.
कोरोनाबाधितांच्या यादीत शनिवारी मध्यप्रदेश आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांची भर पडली. आतापर्यंत 22 राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांत बाधीत आढळले आहे. शनिवारी केरळमध्ये नवे 12 रुग्ण आढळले. त्यात पाच परदेशी रुग्णांचा समावेश आहे. केरळ पाठोपाठ दिल्लीत नऊ बाधीत आढळले. त्यामुळे तेथील बाधीतांची संख्या 26 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात 11 बाधितांची भर पडली.
शुक्रवारी 24 तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक मोठी वाढ झाली. त्या दिवशी 24 तासांत 63 जणांची नोंद करण्यात आली.
आयसीएमआरने आतापर्यंत 15 हजार 404 जणांची तपासणी केली आहे. बाधितांची संख्या वाढल्याने चाचणीसाठी निकषांत बदल केला जात आहे. आता कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या कोणाच्याही थेट किंवा निकटचा संपर्क आलेल्या सर्वांची चाचणी करण्यात येणार आहे. त्याच बरोबर तीव्र श्वसन संसर्ग असणाऱ्यांचीही चाचणी करण्यात येणार आहे. अशी माहिती संचालक रणदीप गुलेरीया यांनी माहिती दिली.