जळगाव (प्रतिनिधी) – येथील शिवाजीनगर परिसरातील दत्तात्रय नगर, कानळदा रोड भागात घरी जात असलेल्या दाम्पत्यावर अज्ञात तीन तरुणांनी प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजेच्या दरम्यान घडली आहे. यातील पतीवर देवकर महाविद्यालयातील सिव्हिल हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु झाले आहेत.
शहरात कानळदा रोड भागात हरिओम नगर येथे राहणाऱ्या योगेश गोपाळ साळी (वय32) व त्यांची पत्नी प्रिया योगेश साळी हे घरी जात असताना रात्री 9 वाजेच्या सुमारास त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. योगेश साळी याची शिवाजीनगर परिसरामध्ये खुशी बियर शॉपी आहे. हे दुकान त्यांच्या आई मंजुळाबाई साळी यांच्या नावावर आहे. शुक्रवारी दिवसभर प्रिया साळी ह्या शाहू महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या होत्या. त्यानंतर रात्री डिस्चार्ज मिळाल्यावर मेडिकल दुकानातून औषधी घेतल्यानंतर दोघेही पती-पत्नी हे हरिओम नगरातील घरी जात होते. त्यावेळी दत्तात्रय नगर परिसरात अचानक तीन जण समोरून आले आणि त्यांनी योगेश साळी याच्या डोक्यात काचेची बाटली मारून जबर दुखापत केली. तसेच शिवीगाळ करीत मारहाण देखील केली. प्रिया साळी यांना देखील त्यांनी शिवीगाळ व दमदाटी केली. कुठल्यातरी धारदार हत्यार योगेश साळीला एकाने मारण्याचा प्रयत्न केला. त्यात योगेशच्या डाव्या हाताला मार लागला. ते घटनास्थळावरून पसार झाले. मारहाण करीत असताना कोणाला विचारून बियर शॉपी मध्ये पार्टनरशिप केली असे विचारून आमची परवानगी घेतली होती का असाही जाब विचारला.
यानंतर जखमी अवस्थेत दोघेही पती-पत्नी हे शहर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले. पोलिसांनी वैद्यकीय मेमो देऊन त्यांना देवकर कॉलेजच्या आवारात असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी रवाना केले. तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. योगेश साळी याच्या डोक्याला मार लागला आहे. डोक्यात घुसलेल्या काचा काढण्यात डॉक्टरांनी यश मिळविले आहे. तसेच योगेश साळी याला यापूर्वी देखील बिअर शॉपीच्या दुकानातच मारहाण झाली आहे. शुक्रवारी रात्री घडलेल्या घटनेमुळे गुन्हेगारी डोके वर काढीत असल्याचे काही दिवसांपासून घडणाऱ्या घटनांतून दिसून येत आहे. याबाबत शहर पोलीस स्टेशन चे पोलीस तपास करीत आहे.