भुसावळ, [प्रतिनिधी] – शनिवारी रात्री राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर भुसावळहून जळगावकडे जाणाऱ्या ओमनी व्हॅनची वायरींग जळाल्याचा धूर निघाल्याने शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून ओमनीत सर्व प्रवाशी सुखरूप असल्याची माहिती मिळालेली आहे.

याबाबत माहिती असे की, भुसावल सिंधी कॉलनीतील रहिवासी नितीन गडियारा हे त्यांच्या ओमनी क्रमांक एमएच 19 ए.ई.5577 या वाहनाने त्यांच्या कुटुंबातील 5 सदस्यांना सोबत रात्री ११.३० वाजेच्या सुमारास जळगाव येथे जात होते. पुढे साकेगाव जवळील वाघूर नदीच्या पुलाजवळील कंपनीसमोर आल्यानंतर व्हॅनमधून वायर जळाल्याच्या वास येऊ लागल्याने चालक गडियारा यांनी प्रसंगावधान राखत वाहनातील सर्वांना तात्काळ खाली उतरवत दूर नेले. याच क्षणी व्हॅनने अचानक भडका घेत संपूर्ण व्हॅन पेटली.यावेळी महामार्गावरील येणाऱ्या जाणाऱ्यांची याठिकाणी एकच गर्दी झालेली होती. घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाचे बंब आल्याने आग आटोक्यात आली.







