पालकमंत्र्यांनी सेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागाची १५ कोटी केले मंजूर
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या प्रस्तावांवर बुधवारच्या महासभेत जोरदार चर्चा झाली. शिवसेना सदस्यांनी यावेळी गदारोळ केला. नितीन बरडे, सुनील महाजन, नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे यांनी विविध रस्त्यांच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित करीत, सेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये निधी देण्यास टाळाटाळ का होते म्हणून सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाला जाब विचारला. यावर भाजप व शिवसेना सदस्यांमध्ये चांगलीच शाब्दीक चकमक झाली.
शहरातील डांबरी रस्ते दुरुस्ती करण्यासाठी नगरसेवकांनी दिलेल्या यादी प्रस्तावावर आणि त्यासाठी २९ कोटी ६७ लाख, ७७ हजार, ५० रुपयांच्या खर्चास मान्यता देण्याविषयी चर्चा झाली. याशिवाय प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २ कोटी ३७ लाख, १८ हजार, ४० रुपये खर्चाला मान्यता देण्याचा विषय देखील चर्चेस आला. याविषयावर महासभेत प्रचंड खडाजंगी झाली. नितीन बर्डे यांनी महाबळ ते गाडगेबाबा चौक दुरुस्तीसाठी पाठपुरावा करूनही मदत मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शहरातील सेनेचे प्रभाग का दुर्लक्षित करतात, असा सवाल विचारला. विरोधीपक्षनेते सुनील महाजन व नितीन बर्डे यांनी सहभाग घेतला. कैलास सोनवणे यांनी,निधीसाठी तुमची राज्यात सत्ता आहे, तुम्ही निधी मंजूर करून आणा, असे सेनेला आवाहन केले. ज्या प्रभागांमध्ये अमृत व भूमिगत गटारींची कामे झाली आहे. अश्या प्रभागात नव्याने ४१ कोटींच्या निधीतून रस्त्यांची कामे केली जाणार आहे.मात्र, यासाठी विलंब लागणार आहे. तसेच प्रभाग क्रमांक १ ते १९ मधील खड्डे बुजविण्याकामी प्रत्येक प्रभागाला स्वतंत्र व समान पद्धतीने निधी दिला जाणार आहे, अशी माहिती महासभेत देण्यात आली.
सत्ताधारी भाजप निधी देण्यामध्ये दुजाभाव करीत असल्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महानगर पालिकेला शिवसेनेच्या १५ नगरसेवकांसाठी प्रत्येकी १५ कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी दिली आहे.