जळगाव (प्रतिनिधी) – येथील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने मंडळाच्या अठराव्या वर्धापन दिनानिमीत्त धरणगाव येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे निवृत्त मराठीचे विभागप्रमुख प्राध्यापक हभप सी. एस. पाटील यांना सूर्योदय सेवारत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी आज ही घोषणा केली आहे.
प्रा. सी. एस. पाटील यांनी ३५ वर्षाच्या महाविद्यालयीन सेवाकाळात विभाग प्रमुख, उपप्राचार्य, नॅक समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळली असून धरणगाव ते महाविद्याय परिसर या दीड कि.मी. रस्त्यावर दुतर्फा ६०० झाडे लावून त्यातली ५५० झाडे जगवली. धरणगाव येथील कामधेनू सेवा मंडळ संचालित कामधेनू गोशाळेचे ते गत २०वर्षापासून अध्यक्ष आहेत.वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत.कीर्तन प्रवचनातून गोसेवा,व्यसनमुक्ती,बेटी बचाओ,पर्यावरण रक्षण इ.विषयावर प्रबोधन ते करतात. आजपर्यंत २००० कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम झाले असून धरणगाव परिसरात ते विनामूल्य सेवा देतात. ते कला विद्याशाखेचे पाच वर्ष सदस्य होते. ते संत साहित्याचा अभ्यासक असून संतविचारांच्या प्रसारासाठी व्याख्याने, प्रासंगिक वैचारिक लेखन ते करतात.
प्रा. सी.एस. पाटील यांनी योगविद्याधाम धुळे या संस्थेत योगशिक्षकचा निवास प्रशिक्षण वर्ग पूर्ण करुन तरुणांना योगाची आवड लागावी यासाठी धरणगावला नि:शुल्क योगवर्गाचे आयोजन करीत असतात. वर्षभर योगवर्ग चालतात. धरणगाव महाविद्यालयातही योगाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम त्यांच्या मार्गदर्शनाने सुरु करण्यात आला. त्यांचे आकाशवाणीवर भाषणे/रूपकाचे कार्यक्रम प्रसारीत झाले आहेत. विविध व्याख्यानमालांमधून बहिणाबाई चौधरी, संत तुकाराम व संत साहित्य परिचय यावर ते व्याख्याने देत असतात. २०१८ मध्ये नाशिक येथील अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविलेले आहे.भारतीय जैन संघटना व रोटरी क्लब यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला असून त्यांचे सतत कीर्तन प्रवचनातून प्रबोधन कार्य सुरु असते.
सूर्योदय सेवारत्न पुरस्काराचे स्वरूप रूपये दोन हजाराचा धनादेश गौरवपत्र असे असून या वर्षापासून रोख रक्कम या पुरस्कारासाठी देण्यात येणार आहे. साहेबराव पाटील, डी. बी. महाजन व प्रवीण लोहार यांचा समावेश असणार्या निवड समितीने प्रा.सी.एस. पाटील यांची निवड केली असून डिसेंबर मध्ये जळगावी होवू घातलेले श्री दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित एक दिवसीय राज्यस्तरीय सतरावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.