लातूर (वृत्तसंस्था) – लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून या मार्गावर नांदगाव पाटीजवळ दोन दुचाकीच्या झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. गेल्या पाच दिवसात घरणी ते ममदापूर दरम्यान अपघातात जीव गमावण्याची ही दुसरी घटना आहे.
अपघातातील जखमीला उपचारासाठी लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गावर नांदगाव पाटीजवळ (तालुका चाकूर) 12 मार्च रोजी आष्टामोडहून क्रमांक नसलेल्या दुचाकीवरून गावाकडे जाणाऱ्या व जानवळकडून आष्टामोडकडे जाणारी एम. एच. 14 झेड. 4547 या मोटारसायकलची समोरासमोर जोराची धडक झाली. या धडकेत अजय सुग्रीव शिंदे (वय 25) राहणार जानवळ हे गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. तर शफीक खलील शेख (वय 28) राहणार आष्टा हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी लातुर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयत शिंदे यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, मुले, असा परिवार आहे.