मुंबई (वृत्तसंस्था) – रत्नागिरी आणि देवगड हापूस सध्या शहरातील किरकोळ बाजारात 500 ते 1200 रुपये डझन या दराने विकला जात आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे यंदा आंबा खरेदीसाठी जवळपास 50 टक्के कमी मागणी आहे. त्यामुळे त्याचा फटका फळ विक्रेत्यांना बसत आहे. तसेच आंब्याची निर्यातही थांबल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांनाही नुकसान सहन करावे लागत आहे. आंबा नाशवंत असल्याने आणि त्याची मागणीही घटल्याने विक्रेतेही कमी प्रमाणातच माल आणत आहेत. शहरात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातच हापूस विक्रीसाठी आणला जातो. त्याला मागणीही चांगली असते. मात्र, सध्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ‘लॉकडाऊन’ सुरू आहे. पर्यायाने, आंबा खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांचे प्रमाण घटले आहे. गुलटेकडी मार्केटयार्डात सध्या पालेभाजी, कांदे-बटाटे आणि फळ विक्रीसाठी ठराविक वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. गेल्या आठ दिवसांपासून आंबा खरेदी-विक्रीसाठी वाहतूक सेवेत अडथळा जाणवत होता. तसेच, मार्केटयार्डात दलाल, माथाडी कामगार कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे देखील आंबा विक्रीवर परिणाम होत आहे. दरम्यान, बुधवारपासून मार्केटयार्डातून रत्नागिरी हापुसची आवक हळू-हळू वाढत आहे. देवगड हापूस मात्र कमी प्रमाणात उपलब्ध आहे. वाशी येथून रत्नागिरी व देवगड हापूसचा पुरवठा चांगला आहे. देवगड हापूस वेंगुर्ला येथूनही विक्रीसाठी येत आहे. रत्नागिरी हापुसचे शहरातील पिंपरी, चिंचवड, निगडी येथील प्रमुख बाजारपेठांमध्ये फेब्रुवारी महिन्यातच आगमन झाले. सुरवातीला तब्बल 21 हजार रुपयांना 5 डझनाची पेटी उपलब्ध होती. सध्या 2 ते 4 हजार रुपयांपर्यंत 4 डझनाची पेटी मिळत आहे. रत्नागिरी हापूसच्या 4 ते 9 डझनापर्यंतच्या पेट्या सध्या घाऊक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर, किरकोळ विक्री पाचशे ते बाराशे रुपये डझन या दराने होत आहे.रत्नागिरी हापूसला मागणी कमी आहे. तसेच, माल पडून राहत असल्याने व्यापारी देखील कमी प्रमाणातच रत्नागिरी हापुस विक्रीसाठी आणत आहेत. देवगड हापूसच्या 5 ते 6 डझनाच्या पेट्या दीड हजारांपासून तीन हजारांपर्यंत उपलब्ध आहे. किरकोळ बाजारात एक डझन आंब्याचे दर पाचशे ते बाराशे रुपयांपर्यंत आहेत, अशी माहिती फळ विक्रेते राजकुमार गुप्ता यांनी दिली.