मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात करोनाचा कहर सुरु असतानाच महाराष्ट्राला पावसाने झोडपले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

आशिष शेलार म्हणाले कि, विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह अनेक भागात पावसाने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान केले. या हाहाकाराकडे, उध्वस्त शेतकऱ्यांकडे ठाकरे सरकारने ना पाहिले, ना मदत. त्यामुळे मुंबईकर हो! सरकारच्या दृष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा ?? शांतता राखा! बदल्या, टेंडर वाटप सुरु आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. परंतु संध्याकाळनंतर पावसाचा जोर अचानक वाढला. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी भरले आहे. त्यामुळे बेस्टची वाहतुकदेखील अन्य मार्गांवरुन वळवण्यात येत असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली. दरम्यान, मुंबईत सकाळी ५.३० वाजेपर्यंत कुलाबा परिसरात १२२.२ मिमी आणि सांताक्रुझ येथे २७३.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.







