जळगाव (प्रतिनिधी) – धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे दुचाकीस तवेरा चारचाकीने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला मुकामार आहे.
दीपक भगवान महाजन (वय २५) रा. मूळ पाचोरा, हल्ली मुक्काम अमळनेर हा जळगावात मोबाईल रिपेअरिंगचा कच्चा माल घ्यायला आला होता. त्याच्या सोबत धनंजय म्हणून तरुण सोबत होता. जळगावातील काम आटोपल्यावर दीपक महाजन धनंजयसह परतीला निघाला. पिंप्री गाव ओलांडल्यावर एका भरधाव अज्ञात तवेरा चारचाकी वाहनाने त्यांना मागून धडक दिली. अपघातात त्यात दीपक रस्त्यावर आपटला गेला. त्याच्या डोक्याला, शरीराला जबर मार लागला. तर धनंजय यास गुडघ्याला किरकोळ मार आहे. त्याच्या मागून येणाऱ्या युवकांनी त्याला तत्काळ जळगावातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. दीपकची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.