शिक्षण निरीक्षकांचे शाळांना आदेश ;
भाजपा शिक्षक आघाडीच्या तक्रारीनंतर शिक्षण निरीक्षकांचे आदेश
मुंबई (प्रतिनिधी) – वर्क फ्रॉम होम ची सवलत असूनही अनेक शाळांमध्ये शिक्षकांना विनाकारण बोलावले जात होते मात्र आता शिक्षण निरीक्षकानी शाळांना दिलेल्या आदेशामुळे विनाकारण बोलावणे थांबले जाणार असून शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे
याबाबत मुंबई प्रदेश भाजपा शिक्षक आघाडीचे संयोजक अनिल बोरनारे यांनी १४ सप्टेंबर रोजी शिक्षण उपसंचालक तसेच उत्तर, पश्चिम व दक्षिण विभागातील शिक्षण निरीक्षकांकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षण निरीक्षकांनी शाळांना आदेश दिले आहेत.
कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्यातरी शिक्षक ऑनलाईन शिकवीत आहेत. तरीसुद्धा अनेक शाळा आठवड्यातून एकदा-दोनदा शाळेत थातुरमातुर कारणे देऊन बोलावीत आहेत. मुंबईतील अनेक शिक्षक ठाणे, नवी मुंबई, रायगड व पालघर जिल्ह्यात राहत असल्याने व लोकल ट्रेन बंद असल्याने खाजगी वाहने करून शाळेत येतात त्यात शिक्षकांचा तीन-चार हजार रुपये खर्च होत असून अनेक शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर मुंबईत व राज्यात काही शिक्षकांचा मृत्यूदेखील झाला आहे.
दि. २४ जूनच्या शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार वर्क फ्रॉम होम ची सवलत देण्यात आली असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत महिला शिक्षक, मधुमेह, श्वसनाचे विकार, रक्तदाब, हृदयविकार व ५५ वर्षांवरील पुरुष शिक्षकांना शाळेत बोलावू नये अशा सूचना परिपत्रकात दिल्यावर सुद्धा अनेक ठिकाणी विनाकारण शाळेत बोलविण्याचे प्रकार घडत आहेत. या घटनांमुळे शिक्षकांना आर्थिक, मानसिक त्रास होत असून कोरोना संसर्गाची भीती वाटत आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी शिक्षक-शिक्षकेतर कोरोना संक्रमण होऊन मृत्युमुखी पडत आहेत.
मात्र आज शिक्षण निरीक्षकांनी काढलेल्या आदेशाने शिक्षकांना दिलासा मिळाला असून शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम करावे असे भाजपा शिक्षक आघाडी मुंबई विभागाचे संयोजक अनिल बोरनारे यांनी सांगितले.