जळगाव (प्रतिनिधी) – कुसूंबाकडील जळगाव टोलनाक्यासमोर झालेल्या हाणामारी प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी दुपारी मुख्य संशयित आरोपी किरण शंकर खर्चे यास अटक केली आहे.
याबाबत विशाल राजू आहिरे (रा. रामेश्वर कॉलोनी) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार १३ सप्टेंबर रोजी जळगाव टोलनाक्यासमोर विशाल आहिरे व त्याचा मित्र हे अंत्यविधी आटोपून येत असतांना संशयित आरोपी किरण खर्चे, आकाश परदेशी, किरण चितळे, राकेश पाटील, गणेश गोसावी यांनी त्यांना चॉपर आणि लोखंडी पाईपने शिवीगाळ करून मारहाण केली होती. त्यात किरण खर्चे व गणेश गोसावी हे फरार होते. सोमवारी किरण खर्चे याला डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातून पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरु होते. तपासात सपोनि अमोल मोरे, सफौ. अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, दीपक चौधरी, असीम तडवी, रवींद्र चौधरी यांनी सहभाग घेतला. किरण खर्चे याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.