न्यायालयीन चौकशीनंतर दोषींवर कारवाई होणार – जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव कारागृहातील न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित रविंद्र उर्फ चिन्या जगतापचा शुक्रवारी ११ रोजी कारागृहात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दरम्यान नातेवाईकांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केल्यावर मृतदेह उचलणार नाही. असा पवित्र घेतला होता.
तसेच इन कॅमेरा शव विच्छेदन करावे अशी मागणी केली होती. त्यानुसार आज सकाळी ११ वाजता न्यायाधिशांच्या उपस्थित जिल्हा शासकीय रूग्णालयात इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी मयताची पत्नी व मुलाने जेलरवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा आम्ही रविंद्रचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने खळबळ उडाली होती. काहि वेळ तणाव निर्माण झाला होता.

मयत रवींद्रला न्याय मिळत नसल्याने पत्नी, मुलासह नातेवाईकांनी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी नातेवाईकांनी कारागृहाअधिक्षक मुर्दाबाद अश्या घोषणा दिल्या. यावेळी रवींद्र जगतापच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांकडे नातेवाईकांनी म्हणणे मांडत जेलरवर कारवाईची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, याप्रकरणात न्यायिक चौकशीचे अधिकार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांना आहे. त्यानंतर पोलिसांकडून दोषींवर कारवाई केली जाईल. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेणार असल्याचे सांगितले.







