पुणे (वृत्तसंस्था) – शहरात नव्याने आणखी एक करोनाची लागण झालेला रुग्ण आढळून आला आहे. 76 वर्षीय हा रुग्ण शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. हा रुग्ण येरवडा परिसरातील दाटवस्तीमधील असल्याने शहरात करोना आता झोपडपट्टीत पोहोचला आहे. त्यामुळे आता पालिका प्रशासनाची चांगलीच कसोटी आहे. तसेच, या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोधही घेणे कठीण बनले आहे. दरम्यान, खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या ज्येष्ठ नागरिकाची प्रकृत्ती स्थिर असून पालिका आता या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेत आहे. 9 मार्चपासून शहरात करोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत सुमारे 20 रुग्ण सापडून आले आहेत. त्यातील जवळपास 11 रुग्ण परदेशातून भारतात आलेले अथवा थेट त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आहेत. तर, इतर 9 रुग्ण कोणत्याही परदेश दौऱ्यावरून अथवा अशा व्यक्तींच्या संपर्कात आलेले नाहीत. या सातमधील प्रत्येकी 3 रुग्णांना घरातील व्यक्तीमुळे लागण झाली असून 3 जणांना या आजाराची गर्दीतील व्यक्तीच्या संपर्कातून लागण झाली आहे. त्यातच, रविवारी सापडलेला रूग्ण येरवडा परिसरातील दाटवस्ती असलेल्या भागातील आहे. त्यामुळे आता या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी किती व्यक्तींमध्ये करोनाचा प्रसार केला हे शोधणे अवघड बनले आहे. दरम्यान, प्रशासनाने या रुग्णांची गेल्या तीन दिवसांतील दिनचर्या, या व्यक्तीच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्ती तसेच आसपासच्या घरांची तपासणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.