पुणे (वृत्तसंस्था) – करोनाच्या पार्श्वभूमीवर काही डॉक्टरांनी बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) बंद केली आहे. त्यामुळे नागरिकांना वैद्यकीय तपासणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सहकार्याने मोबाइल क्लिनिकला परवानगी दिली आहे. मात्र, या ठिकाणी गर्दी झाल्यास ही सेवा खंडित केली जाणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. काही डॉक्टरांनी ओपीडी बंद केल्या आहेत. या ओपीडी सुरू कराव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रतिनिधींनी डॉ. म्हैसेकर यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी सांगितल्या. गर्दी होऊ नये, म्हणून काही ठिकाणी ओपीडी बंद ठेवल्या आहेत. संबंधित डॉक्टर टेलिमेडिसिनद्वारे आपल्या रुग्णांच्या संपर्कात आहेत. वैद्यकीय सेवेची गरज भासल्यास सेवा देण्याचे आश्वासन डॉक्टरांनी दिले आहे.इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी मोबाइल क्लिनिक ही संकल्पना मांडली आहे. या संकल्पनेला मान्यता दिली आहे. त्यामार्फत विविध भागांमध्ये नागरिकांची तपासणी होणार आहे. मात्र, संबंधित ठिकाणी गर्दी होत असल्याचे निदर्शनास आल्यास ही सेवा खंडित केली जाणार आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शहरात लष्कराला पाचारण केले नसून, भविष्यात गरज भासल्यास लष्कराकडून काय अपेक्षित आहे, हे कळवले आहे. दरम्यान, सध्या पंधरा दिवस पुरेल, एवढा रक्ताचा साठा आहे. भविष्यात रक्ताची गरज भासणार असल्याने नागरिकांनी रक्तदान करावे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.