पुणे (वृत्तसंस्था) – करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने जमावबंदी कायदा लागू करीत संचारबंदी केली असताना अनेकजण जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. आपल्याला काय होतेयं या अविर्भावात काही तरुण मिळलेल्या सुट्ट्यांच्या गैरफायदा घेत मित्रमंडळींना जमा करून मिळेल त्या ठिकाणी पार्ट्या करीत सुटले आहेत. अशा बेजबाबदार, असंवेदनशील आणि पार्टी करणारांना लोणावळा ग्रामीण पोलिसांनी चांगलाच धडा शिकविला आहे. लोणावळा शहरातील वलवन धरणाच्या बॅक वॉटरला जंगलामध्ये मागील काही दिवसांपासून रोजच शेकडो लोक पार्टी आणि मौजमजा करण्यासाठी जमत आहेत. हे सर्व लोक आजूबाजूच्या गावांमधील आहेत. रविवारीसुद्धा सुमारे 200 हून अधिक लोक या ठिकाणी पार्टीसाठी जमले असल्याची बातमी लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळाली. पोलीस तेथे गेले असता, पोलिसांना दुरूनच बघून तेथील बहुतेक जण पार्टीचे सर्व सामान जागेवर सोडून मिळेल त्या मार्गाने जंगलात आणि डोंगरावर पळून गेले. मात्र, त्यातही काहीजण पोलिसांच्या हाती लागले. जे कोणी सापडले त्या सर्वांना पोलिसांनी 25 जोर आणि 50 बैठका मारण्याची शिक्षा देत चांगलीच अद्दल घडवली. एकीकडे आपला देश आणि संपूर्ण जग करोना सारख्या अदृश्य शत्रूसोबत लढत असताना, दुसरीकडे बेजबाबदारपणे स्वतःला आणि पर्यायाने आपल्या कुटुंबाला, समाजाला मृत्यूच्या खाईमध्ये लोटणाऱ्या अशा नागरिकांना याहून अधिक कडक शिक्षा करणे काळाची गरज बनली आहे.