पुणे (वृत्तसंस्था) – करोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने पेट्रोल विक्रीवर घातलेले निर्बंध धुडकावून लावत वडूज (ता.खटाव ) येथील पंपावर खुलेआम पेट्रोल विक्री सुरु होती. वडूज शहरातील स्टेट बॅंकेच्या शेजारील इंडियन ऑइल कंपनीचा पेट्रोल पंप आहे. या पंपावर खुलेपणाने पेट्रोलची विक्री चालू असल्याचे समजताच परिसरातील दुचाकी, चारचाकी वाहनांची पेट्रोल भरून घेण्यासाठी मोठी गर्दी उसळली. शासनाने घातलेले निर्बंध झुगारून देऊन सर्रासपणे ही विक्री केली जात होती. यावेळी पंपावर एवढी गर्दी होती की दुहेरी रांगा करूनही पंपाच्या बाहेर मुख्य रस्त्यावर मोठीच्या मोठी रांग पेट्रोल भरून घेण्यासाठी लागलेली होती. करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य व देश पातळीवर कठोर निर्णय घेतले जात असताना ग्रामीण भागात अशा प्रकारे सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी केली जात आहे. प्रशासन याप्रकरणी लक्ष घालून कठोर कारवाई करणार का, की नेहमीप्रमाणे राजकीय हस्तक्षेप होऊन असे लोक सही सलामत सुटणार, हे आगामी काळातच स्पष्ट होईल. या प्रकरणी अद्यापपर्यंत वडूज पोलिस ठाण्यात कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.