मुंबई (वृत्तसंस्था) – खेड तालुक्यात करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तिन्हेवाडी येथील एक व आळंदी येथील एका हॉस्पिटलमधील 13 जण संशयित रुग्ण असून त्यापैकी 6 डॉक्टर असल्याची धक्कादायक माहिती प्रशासनाकडे आली. या सर्वांच्या स्वॅब टेस्ट घेण्यात आल्या असून, त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान राजगुरूनगर येथील एक संशयिताचा अहवाल येणे बाकी असून तो उद्या येणार आहे. तालुक्यात याबाबत अत्यंत खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती प्रांत तथा उपविभागीय अधिकारी संजय तेली यांनी दिली.
खेड तालुक्यात आतापर्यंत एकही करोनाबाधित रुग्ण नाही; मात्र करोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 15 जणांची स्वॅब टेस्ट करण्यात येणार आहे. आज आरोग्य विभागाच्या माध्यमातून संबंधित हॉस्पिटलचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. करोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाययोजना करण्यात आल्याझड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी सांगितले.
याबाबत प्रांताधिकारी संजय तेली यांनी सांगितले की, खेड तालुक्यात येणारे महत्वाचे 20 मोठे रस्ते जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बंद करण्यात आले आहेत. तालुका बाहेरील नागरिकांना सक्त मनाई करण्यात आली आहे. मावळ, आंबेगाव व शिरूर या तालुक्याला जोडणाऱ्या सीमा लॉकडाऊन असेपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. खेड तालुक्यात एमआयडीसीमध्ये 108 कंपन्या सुरू करण्यास राज्य सरकाने परवानगी दिली असून, त्यामधील 3463 कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न सुटला आहे.
करोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी या कंपन्यामंध्ये शासनाचे नियम पाळले जातात की नाही यासाठी उपअभियंता एम. एम. शिंदे, व उपविभागीय भूमी अभिलेख अधिकारी उमेश झेंडे यांचे पथक नेमण्यात आले आहे. तीन दिवसात याबाबतचा अहवाल मागविण्यात आला आहे. तालुक्यातील परप्रांतीय कामगारांच्या जेवणाची सोया व्हावी यासाठी 15 ठिकाणी कम्युनिटी किचन सुरु करण्यात आली आहेत.
त्यामाध्यमातून 14,800 लोकांना दोन वेळचे जेवण देण्यात येत आहे. त्यासाठी महसूल विभागाकडून गहू, तांदूळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. 4 लाख 50 हजार कुटुंबापैकी तालुक्यात 1 लाख 9 हजार नागरिकांना तर 2 लाख 90 हजार नागरिकांना अंत्योदय व प्राधान्य रेशन वाटप केले जात आहे.
खेड तालुक्यातील आळंदी, चाकण व राजगुरूनगरसाठी कोविड मॅनेजमेंट प्लॅन (व्यवस्थापन आराखडा) तयार करण्यात आला आहे. तालुक्यात करोना संक्रमित रुग्ण आढळल्यास सर्वोतोपरी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परिसर सील झाल्यास घरपोच सेवा देण्यासाठी स्वयंसेवकांची निश्चिती करण्यात आली आहे. 15 खासगी हॉस्पिटल परिस्थितीनुसार मदतीला घेण्यात आली असून, 1600 रुग्णांवर उपचार करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात बाहेरगावावरून तालुक्यात येणाऱ्या व्यक्तींना 15 ठिकाणी इन्स्टिट्यूट क्वारंटाईन (संस्थात्मक विलगीकरण) करण्याची प्रक्रिया सुरु आहे. बाहेरगावातून येणाऱ्या नागरिकांवर व त्यांना आणणाऱ्या व्यक्ती व वाहनावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. हॉटस्पॉटमधून आलेल्या व्यक्तींना येथील चांडोली जवळील वसतिगृहात ठेवण्यात येणार आहे. खेडमध्ये येण्याचा कोणीही प्रयत्न करून नये, तसे केल्यास गुन्हे दाखल करू असा इशारा प्रांताधिकारी तेली यांनी दिला आहे.