जळगाव (प्रतिनिधी) – काल शहरात आढळून आलेला कोरोनाचा रूग्ण मृत झाल्याने प्रचंड खळबळ उडाली असून यामुळे शहरवासियांनी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे दिसून आले आहे. हा खान्देशातील कोरोनाचा पहिलाच बळी ठरला आहे.
दरम्यान, काल रात्री शहरातील सालार नगर परिसरातील व्यक्ती कोरोनाचा पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले होते. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. हा रूग्ण सिव्हील हॉस्पीटलमध्ये दाखल झाला तेव्हाच त्याची प्रकृती अतिशय खालावली होती. कोरोना पॉझिटीव्ह झाल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. आज सकाळी त्याची प्रकृती अजून गंभीर बनल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. यानंतर दुपारी तीनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले.