वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) – जगभर करोना विषाणूंच्या प्रसाराचा जो धोका निर्माण झाला आहे त्या पार्श्वभूमीवर जगातील अत्यंत प्रभावशाली समजल्या जाणाऱ्या 20 देशांच्या जी 20 संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांची काल व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. त्यात या देशांनी एकत्रितपणे या आव्हानाचा मुकाबला करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या संबंधात माहिती देताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, आम्ही या समस्येवर सखोल विचारविनिमय केला. ही समस्या फार काळ राहणार नाही अशी आशा आहे. आम्ही जगभरातील करोना नियंत्रणात आणण्यासाठी आमच्या मित्र राष्ट्रांसह एकत्रित उपाययोजना करणार आहोत. त्यावर आमची चर्चा झाली आहे. त्यातून अनेक नवीन आणि चांगल्या कल्पना पुढे आल्या आहेत, असे त्यांनी व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत सांगितले. जगातील 151 देशांमध्ये करोनाचा प्रसार झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. या अनुषंगाने आमच्या प्रत्येकापुढे असलेल्या आव्हानांचे स्वरूप वेगवेगळे असले तरी आम्ही एका विचाराने या समस्येचा मुकाबला करण्यास कामाला लागलो आहोत असे ते म्हणाले. आम्ही जी 20 चे सर्व राष्ट्रप्रमुख एकमेकांशी चर्चा करून उपायांच्या माहितीची देवाणघेवाण करीत आहोत. या उपायांमध्ये भविष्यात उद्भवणाऱ्या आर्थिक आव्हानांच्या संबंधातही चर्चा सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, अमेरिकेच्या अध्यक्षांनी फ्रान्सच्या अध्यक्षांशी याविषयी दूरध्वनीवर स्वतंत्रपणे चर्चा केली.