मुंबई (वृत्तसंस्था) – आता येत्या काही दिवसांत कोरोनाची बाधितांची संख्या गुणाकार करू लागेल. मात्र, त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही. त्याचवेळी वेळेत उपचार घेणारे बरे होऊन घरीही परतत आहेत. तेव्हा चाचणी सुरू करण्या आधी परदेशातून आलेले मात्र तपासणी न झालेल्यांना जर कोरोनाची लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी सरकारी रुग्णालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी सायंकाळी केले. मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमांद्वारे जनतेशी संवाद साधला, ते म्हणाले, पुढील 15 दिवस कसोटीचे आहेत. त्यानंतर आपल्याला कोणी रोखू शकणार नाही, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी बाजारात आणि भाजी मंडईत होणारी गर्दी टाळण्याचे आवाहन केले.अन्य राज्यातील मजुरांनी आणि परगावात राहणाऱ्या मराठी माणसांनी आहे तेथेच रहावे. त्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्था पुढे आल्यास सरकारला मदत होईल. तसेच त्या मजुरांशी संपर्क साधून त्यांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. अन्य राज्यात असणाऱ्या मराठी माणसांना मदत करण्याचे आवाहन मी त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले आहे, असे ते म्हणाले.वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आणि पोलिस आपल्यासाठी अहोरात्र झटत आहेत. ते आपल्या कुटुंबियांना सोडून तुमच्यासाठी लढत आहेत याचा विसर पडू देऊ नका, असे आवाहन करतानाच शिवभोजन केंद्राची वेळ दोन तासांवरून तीन तास करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. ते म्हणाले, हातावर पोट असणाऱ्यांसाठी हा कसोटीचा काळ आहे, पण आपण हिंमतीने याचा सामना केल्यास या संकटाला आपण पराभूत करू शकतो, असा मला विश्वास आहे.या संकट काळात राज्य सरकारच्या मदतीला धावून येणाऱ्या शिर्डी देवस्थान ट्रस्ट आणि सिध्दीविनायक ट्रस्टचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. घरी आनंदात सकारात्मक पध्दतीने वागून या संकटाला पराभूत करा असे आवाहन त्यांनी केले.