मुंबई (वृत्तसंस्था) – देशामध्ये कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्र राज्यातील मुंबईत कोरोनाची पकड दिवसागणिक आणखी मजबूत होताना दिसत आहे. परिणामी नागरिकांमध्ये याबाबतची दहशत पाहायला मिळत आहे. दरदिवशी वाढणारा कोरोना रुग्णांचा आकडा आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान उभं करत आहे. ज्यामुळे आता रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या उपचारांदरम्यान हेळसांड होत असल्याचं दाहक वास्तव समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वीच सायन आणि केईएम रुग्णालयातील रुग्णांच्या उपचारांदरम्यान दिसणारा बेजबाबदारपणा सोशल मीडिया व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांसमक्ष आला होता. ज्यात भर म्हणून पुन्हा एकदा मुंबईच्या केईएम रुग्णालयातील एक भयावह व्हिडिओ धक्का देत आहे.
एका रुग्ण महिलेनेच हा व्हिडिओ शूट केला आहे. राम कदम यांनीही ट्विटरच्या माध्यमातून हा व्हि़डिओ पोस्ट करत उद्धव ठाकरे प्रशासनाकडे या दुरावस्थेसाठीचे प्रश्न उपस्थित केले आहेत.







