मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशात विदर्भामध्ये कोरोनाची लागण झालेले आणखी ५ रुग्ण आढळल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपूरमध्ये ४ तर गोंदियामध्ये एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. या सर्वांवर स्वतंत्र कक्षामध्ये उपचार सुरु करण्यात आले असल्याची माहिती नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी दिली आहे.
नागपूरमध्ये आतापर्यंत कोरोनाची लागण झालेले फक्त ४ रुग्ण होते. मात्र एका दिवसात आणखी ५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. त्यामुळे नागपूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ९ वर पोहचली आहे. गुरुवारी दिल्लीवरुन आलेल्या एका व्यक्तीची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या त्याच्या नातेवाईकांची तपासणी करण्यात आली. तर त्याच्या कुटुंबातील तिघे आणि नोकराला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. दरम्यान, गोंदियामध्ये देखील एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हापातळीवर योग्य ती पाऊलं उचलली जात आहेत. नागपूर आणि गोंदियामध्ये आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या सर्व लोकांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. तसेच त्यांना तपासणी अहवाल येईपर्यंत होम क्वारेंटाइन करण्यात येणार आहे. तर राज्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १३५ वर पोहचला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.