मुंबई (वृत्तासनस्थ) –समाजात एकीकडे कोरोनाची भीती असताना पालघरमधील वाडा तालुक्यातील डेंग्यू तापाचे रुग्ण आढळलेल्याने नागरिक चिंतेत असून आरोग्य यंत्रणेपुढेही डोकेदुखी वाढली आहे. वाडा तालुक्यातील वावेघर गावात आजवर 20 डेंग्यू तापाचे रुग्ण आढळले असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. हे सर्व रुग्ण विविध खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून आरोग्य यंत्रणेला माहिती मिळाल्यानंतर आता गावात फवारणी करण्यात येत आहे.वावेघर गावात डेंग्यूचा पहिला रुग्ण 14 एप्रिलला आढळून आला होता. त्यानंतर सातत्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत रुग्णांची संख्या 20 वर पोहचली आहे. एकीकडे आरोग्य यंत्रणा कोरोनावर मात करण्यासाठी झटत असताना एकाच गावात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने ही साथ आटोक्यात आणण्याचे आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान असणार आहे.