नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – चीन आणि नेपाळनंतर भूताननेही भारताला धोका दिला असल्याची चर्चा गुरुवारी रंगली होती. भूतानने भारताला मिळणारे पाणी रोखले असल्याचे वृत्तही देण्यात आले होते. मात्र, हे वृत्त भूतानने फेटाळून लावले आहे.

चीनच्या दबावाखाली येऊन भूताननेही आसामच्या बक्सा जिल्ह्यातील पाणी रोखले असल्याचे वृत्त होते. बक्सा जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी भारत-भूतान सीमेववर समद्रूप जोंगखार परिसरात जाऊन नदीचे पाणी सिंचनासाठी आणतात. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर भूतानने परदेशी नागरिकांना देशात प्रवेश बंद केला असून यामध्ये भारतीय शेतकरी असल्याचीही चर्चा होती. यामुळे बक्सा जिल्ह्यातील शेतकरी घाबरले असून दोन-तीन दिवसांपासून आंदोलन करत आहेत. सोमवारी आंदोलकांनी रोगिंया-भूतान रस्ता अडवला होता. केंद्र सरकारने भूतानसमोर हा मुद्दा उपस्थित करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती.
सूत्रांनुसार, भूतानने आसामला जाणारे पाणी रोखले असल्याचे वृत्त चुकीचे असून यामध्ये सत्य नाही. याउलट आसामला मिळणाऱ्या पाण्याचा प्रवाह जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी वाहिन्यांमध्ये दुरुस्ती करण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा प्रशासन, उपविभाग प्रशासन, महापौर कार्यालय, कोविड टास्क फोर्सचे सदस्य, सरकारी सेवकांचे स्वयंसेवक, भूतानतील स्थानिक समुदायांचे सदस्य सगळे काही सुरळीत व्हावे यासाठी मेहनत घेत आहेत. सतत पाऊस पडत असल्याने डोंगर परिसरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला आहे. यामुळे भूतानमधील सरकारी यंत्रणा पाण्याचा प्रवाह सुरळीत व्हावा यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. भारतीय मित्र आमची समस्या समजून घेतील, अशी अपेक्षा भूतानने व्यक्त केली आहे.







